
चीनच्या रोबोटला गलगोटिया विद्यापीठाचा शोध असल्याचे सांगणाऱ्या प्राध्यापिका नेहा सिंह आता नवीन नोकरीच्या शोधात आहेत. नेहा सिंह यांनी लिंक्डइन प्रोफाईलवर ‘ओपन टू वर्प’ असे स्टेट्स अपडेट केले आहे. दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिटमध्ये चिनी रोबोटला स्वतःचा आविष्कार म्हणून दाखवणे गलगोटिया विद्यापीठाच्या चांगलेच अंगलट आले आहे. विद्यापीठाने या संपूर्ण प्रकरणासाठी नेहा सिंह यांना जबाबदार धरत माफी मागितली आहे. यासंबंधी माहिती देताना विद्यापीठाने म्हटले की, आमच्या एका प्रतिनिधीला यासंबंधी योग्य माहिती नव्हती. त्यांनी कॅमेऱ्यासमोर आल्याने उत्साहाच्या भरात चुकीची माहिती दिली. प्रसारमाध्यमांशी बोलण्यासाठी त्यांची अधिकृत नेमणूक केली नाही तरीही त्या माध्यमांशी बोलल्या आहेत, हे चुकीचे आहे, असे विद्यापीठाने म्हटले आहे. एआय इम्पॅक्ट समिटमध्ये बोलताना नेहा सिंह म्हणाल्या होत्या की, या रोबोटिक डॉगचे नाव ‘ओरियन’ आहे. हे गलगोटिया विद्यापीठाच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ने तयार केले असून विद्यापीठ एआय क्षेत्रात 350 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे.



























































