
माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत सांगली जिल्हा परिषदेने सलग तिसऱयांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरीत तासगाव पंचायत समितीने राज्यात प्रथम, मिरज पंचायत समितीने द्वितीय, तर कवठेमहांकाळ पंचायत समितीने तिसरा क्रमांक पटकाविला. सांगली जिह्यातील 13 ग्रामपंचायतींनी तब्बल 11 कोटींचे बक्षीस मिळवले.
पर्यावरणपूरक उपक्रम, स्वच्छता, जलसंधारण, ऊर्जाबचत, वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, जैवविविधता संवर्धन यांसारख्या विविध घटकांवर आधारित गुणांकन केले जाते. जिह्यातील ग्रामपंचायतींनी मोठय़ा प्रमाणावर लोकसहभागातून विविध उपक्रम राबवून पर्यावरण संरक्षणाची प्रभावी चळवळ उभी केली आहे. त्यामुळे जिह्याला राज्यस्तरावर विशेष पुरस्कार मिळाले आहेत.
एक हजार लोकसंख्या गटात पिंपळवाडीचा राज्यात द्वितीय क्रमांक आला आहे. 1 ते दीड हजार लोकसंख्येत अलकूड एम. ग्रामपंचायतीने विभागस्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला. 2 ते 3 हजार लोकसंख्या गटात नांगोळी (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीचा राज्यात प्रथम, लंगरपेठने राज्यात तृतीय क्रमांक मिळविला. 3 ते 5 हजार लोकसंख्येत आळसंद (ता. खानापूर) ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम, तर वाळेखिंडी (ता. जत) ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळविला आहे. याच गटात धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचातीला विभागस्तरावर दुसरा क्रमांक मिळाला आहे. 5 ते 10 हजार लोकसंख्या गटात येडेनिपाणी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याच ग्रामपंचातीला भूमी थिमेटिक प्रकारात राज्यस्तरावर पहिला, तर मिरजमधील सलगरे ग्रामपंचायतीने विभागस्तरावर दुसरा क्रमांक पटकाविला आहे. 10 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या गटामध्ये वाळवा तालुक्यातील वोरगाव ग्रामपंचायतीने राज्यात द्वितीय, कासेगावने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. विभागस्तरात पेठ ग्रामपंचायतीला दुसरा क्रमांक मिळाला आहे.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱया ग्रामपंचायती, मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांचा दि. 21 रोजी मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळेच यश – शशिकांत शिंदे
सांगलीकरांचा सहभाग, प्रभावी नियोजन आणि पर्यावरणाची बांधिलकी यामुळे जिल्हा परिषदेने सलग तिसऱयांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे यामध्ये योगदान असल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी सांगितले.




























































