मध्य रेल्वेवर प्रवासी संख्येत मोठी वाढ, जानेवारीत तब्बल 12 कोटींहून अधिक जणांचा लोकल प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेवर प्रवासी संख्येत मोठी वाढ झाल्याची आकडेवारी प्रशासनाने गुरुवारी जाहीर केली. जानेवारीमध्ये एका महिन्यात तब्बल 12 कोटी 70 लाखांहून अधिक जणांनी मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनमधून प्रवास केला. एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या दहा महिन्यांत लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधील प्रवाशांची संख्या 137 कोटींच्या घरात नोंद झाली आहे.

मध्य रेल्वे मार्गावर दररोज 40 लाख लोक प्रवास करतात. प्रवासी संख्येत उल्लेखनीय वाढ झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने गुरुवारी जाहीर केले. सन 2025-26 या आर्थिक वर्षात लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या प्रवाशांची संख्या 137 कोटींहून अधिक नोंद झाली. मागील आर्थिक वर्षात याच अवधीत 134 कोटींहून अधिक प्रवाशांची नोंद झाली होती. त्यावरून वर्षभरात सुमारे 1.86 टक्के अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याचे स्पष्ट होत आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये लोकलमधून 120 कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत 118  कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. गेल्या महिन्यात मध्य रेल्वेतून 14 कोटी 60 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. त्यापैकी 12 कोटी 90 लाख प्रवाशांनी लोकल प्रवास केला.

बेलापूर, उरण भागातील अतिरिक्त सेवा फायदेशीर

नेरुळबेलापूरउरण विभागात अतिरिक्त सेवा सुरू केल्यानंतर तसेच या मार्गावर तरघर आणि गव्हाण ही दोन नवीन स्थानके सुरू केल्यानंतर प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकल सेवेला अवघ्या 16 दिवसांत सहा लाखांहून अधिक प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.