Mumbai crime news – लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने व्यापाऱयाला दिली धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने व्यापाऱयाला वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी चौघांना विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. दीपक डंगोल, माजिद खान, फैजान खान आणि साहिल शेख अशी त्या चौघांची नावे आहेत. त्या चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

तक्रारदार हे व्यापारी असून ते कुटुंबीयांसोबत विलेपार्ले येथे राहतात. नुकताच त्यांना एकाने फोन केला. फोन करणाऱयाने तो बिष्णोई टोळीचा सदस्य असल्याचे भासवले. खंडणीची रक्कम न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांना विविध नंबरवरून खंडणीसाठी फोन येऊ लागले. टोकन म्हणून सुरुवातीला 5 लाखांची खंडणी मागण्यात आली. जर पैसे दिले नाही तर गेम करणार अशीच धमकी दिली. त्या धमकीने तक्रारदार हे घाबरले. त्यांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.

खंडणीची रक्कम घेण्यासाठी चौघांना बोलावले. ते चौघे तेथे आले. पोलिसांनी सापळा रचून त्या चौघांना ताब्यात घेतले. दीपक आणि फैजान हे पुण्याचे रहिवासी आहेत. फैजान हा एसी दुरुस्तीचे तर दीपक हा कुकचे काम करतो. तसेच माजिद आणि साहिल हे दोघे गोवंडी येथे राहतात. भीतीचे वातावरण निर्माण करून त्याने खंडणीसाठी फोन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्या चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.