
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधत भगवती ग्रुप आणि हावरे प्रॉपर्टीज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित भव्य गृहनिर्माण योजना नुकतीच डोंबिवली येथे लोकांसाठी जाहीर केली. आणि खास बात म्हणजे या ऐतिहासिक योजनेचे नाव त्यांनी ‘स्वराज्य’ असे ठेवले असून, त्या संकल्पनेला साजेसं शीर्षक गीतही आता त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. ‘स्वराज्य’ या भव्य गृहनिर्माण योजनेचे हे इतिहासाची झलक दाखवणार गाणं जीओडीचे सर्वेसर्वा स्वप्नील राऊत आणि अंकित शहा यांच्या संकल्पनेतून साकारले गेले आहे. आणि अर्थातच हे गाण शिवरायांच्या आजच्या या जन्मोत्सवी प्रत्येकजण गुणगुणताना दिसणार आहे.
या गाण्याला सुप्रसिद्ध गायक रोहित राऊतने आपल्या दमदार आवाजात स्वरबद्ध केलं आहे. तर संगीतकार प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांनी या गाण्याला प्रेरणादायी, ऐतिहासिक भावनेने भारलेले भव्य संगीत दिले आहे. इतिहासाचा अभिमान, स्वराज्याची प्रेरणा आणि मराठी अस्मितेची जाणीव जागवणारे हे गीत श्रोत्यांच्या मनात नक्कीच विशेष स्थान निर्माण करत आहे यांत शंका नाही.
या गाण्यामध्ये निक शिंदे, तश्वी भोईर, अंकिता भगत, अस्मिता सुर्वे, विजय सोनावणे, रश्मी सोनावणे, अपूर्वा पाटील, सृष्टी बहेकर आणि वर्षा मोरेकर यांनी विविध भूमिका साकारत या गाण्याला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे. विशेष म्हणजे हावरे प्रॉपर्टीजचे सर्वेसर्वा अमर हावरे यांनीदेखील पाहुणे कलाकार म्हणून या गाण्यात सहभाग घेतला असल्याचं दिसत आहे. हावरे प्रॉपर्टीजचे अमर हावरे आणि भगवती ग्रुपचे धरम पटेल यांच्या संयुक्त पुढाकारातून हे गाणं लोकांच्या भेटीला आले आहे. गाणे प्रदर्शित होताच शेकडो प्रेक्षकांनी त्यावर रील्स तयार करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अनेक कलाकार आणि रसिकांनी या गाण्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.
या गाण्याबद्दल बोलताना जीओडीचे संस्थापक स्वप्नील राऊत म्हणाले, “जेव्हा स्वराज्य हे नाव माझ्यासमोर आले तेव्हा महाराजांचा संपुर्ण इतिहास माझ्यासमोर आला. आणि स्वराज्य नावाची गृहनिर्माण योजना येतेय त्यावेळी गाण्यामार्फत ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी हे अगदी मनापासून वाटलं. प्रशांत नाकती यांना संपर्क करून दोन दिवसांत हे गाण पूर्ण झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्यांच्यासाठी एखाद गाणं आणि अशाप्रकारची योजना येते हे माझ्यासाठी खूप गौरवास्पद आहे”.
सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत म्हणाला, “माझा मित्र प्रशांत नाकतीचा मला फोन आला. आणि त्याने मला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक गाण आहे, ते जेव्हा मी ऐकलं तेव्हा लगेच मी त्याला हे आपण रेकॉर्ड करूया असं म्हटलं. इतर गाण्यांपेक्षा महाराजांच गाणं गाताना मला जास्त आनंद होतो, जास्त अभिमान वाटतो. या गाण्याचं संगीतही एतकं सुंदर झालं आहे की ते ऐकतानाही अंगावर काटा येतो. त्यामुळे हे गाणं मी गायलं याचा मला सार्थ अभिमान आहे”.
हावरे प्रॉपर्टीजचे अमर हावरे म्हणाले, “स्वराज्य’ गृहनिर्माण योजना ही आमच्यासाठी ऐतिहासिक आणि अभिमानाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित ही पहिलीच टाउनशिप आता डोंबिवलीत साकारत आहे. हीच संकल्पना महाराष्ट्रातील अनेक भागांत विस्तारण्याचा आमचा मानस आहे. ‘स्वराज्य’ हे गीत या संकल्पनेला अधिक बळ देते. हे गाणे ऐकताना आणि पाहताना प्रत्येकाला आपण छत्रपतींचे मावळे असल्याची जाणीव होते. हे गीत महाराजांविषयी अभिमान आणि स्वाभिमान जागवणारे आहे.”




























































