पाळीव कुत्र्यावरून लग्नात राडा; वर-वधू पक्षात तुफान हाणामारी अन् संतापलेल्या नवरीने मोडले लग्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पाळीव कुत्र्यावरून सुरू झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. खागा कोतवाली परिसरातील एका गेस्ट हाऊसमध्ये बुधवारी रात्री लग्नाचा सोहळा उत्साहात सुरू होता. प्रयागराज येथून वधू पक्ष आणि उत्साहाने आलेल्या वर पक्षाचे सुरुवातीचे सर्व विधी शांततेत पार पडले. जयमालेचा कार्यक्रमही आनंदाने पार पडला, मात्र पहाटेच्या वेळी एका क्षुल्लक कारणाने लग्नाचे रूपांतर हाणामारीत झाले.

पहाटे चारच्या सुमारास मंडपात दागिने देण्याचा विधी (जेवर रस्म) सुरू होता. याच दरम्यान मंडपाजवळ बांधलेला नवरीचा पाळीव कुत्रा भुंकू लागला. यावेळी नवरदेवाकडील एका तरुणाने रागाच्या भरात त्या कुत्र्याला मारहाण केली. आपल्या लाडक्या मुक्या प्राण्याला मारहाण केल्याचे पाहून नवरीकडील मंडळी संतापली आणि दोन्ही पक्षांत शाब्दिक चकमक सुरू झाली. पाहता पाहता या वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले.

दोन्ही बाजूचे लोक इतके भडकले की पाहुण्यांनी एकमेकांवर लाठ्या-काठ्या आणि खुर्च्या फेकायला सुरुवात केली. या भीषण हाणामारीत नवरीकडील एका महिलेसह तीन जण गंभीर जखमी झाले, तर नवरदेवाकडील दोन जण जखमी झाले. लग्नमंडपात एकच खळबळ उडाली आणि पाहुणे इकडे तिकडे धावू लागले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावले. तिथे पोलिसांसमोर नवरीने जो निर्णय घेतला, त्याने सर्वांनाच धक्का दिला. लग्नमंडपात झालेल्या हिंसक प्रकारामुळे आणि आपल्या पाळीव प्राण्याला मिळालेल्या वागणुकीमुळे संतापलेल्या नवरीने या मुलाशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. नवरीच्या खंबीर भूमिकेमुळे अखेर दोन्ही पक्षांना माघार घ्यावी लागली. एका कुत्र्यावरून झालेल्या या वादाची चर्चा आता संपूर्ण परिसरात रंगली आहे.