
मंत्रालयातील भ्रष्टाचारानंतर एसीबी आता अॅक्शन मोडमध्ये असून एसीबीने बीड जिल्ह्यातील परळीत धाड टाकली आहे. तेथे लाचप्रकरणी तहसीलदारच जाळ्यात अडकला आहे. परळीतील तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे लाच प्रकरणात अडकल्याची घटना उघड झाली आहे. तक्रारदारास सालन्सी प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
परळीतील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी तक्रारदारांना सालन्सी प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती वीस हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला होता. मात्र, तक्रारदाराच्या हालचालीवर संशय आल्याने तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगितले. तरीही एसीबीने आवश्यक ते सर्व पुरावे एकत्र करून व्यंकटेश मुंडे यांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
एसीबीच्या या कारवाईमुळे महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. तर गेल्या काही दिवसांत एसीबीच्या वाढत्या छाप्यांमुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, अद्यापही सरकारी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांचे काम करण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याचं भीषण वास्तव आहे.


























































