
जालन्यातील बसस्थानक रोडवरील वैष्णवी लॉज व मोक्ष लॉजवर चालणार्या वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी छापा टाकुन 7 पुरुष आरोपींना जेरबंद करुन १३ पिडीत महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली आहे.
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. बसस्टॅन्ड रोडवरील वैष्णवी लॉज व मोक्ष लॉज येथे लॉज मालक लॉजमध्ये महिलांना आणुन त्यांच्याकडून अनैतिक देहव्यापार करून घेत आहे, या माहितीवरुन दोन्ही ठिकाणी कारवाई करण्यात आली. पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी व पथकाचे अंमलदारांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी छापा टाकला.
यावेळी मोक्ष लॉजचे मालक सचिन नंदु पवार (रा. वाटुर ता. परतुर जि. जालना) हे मॅनेजर संतोष भोलेनाथ जाधव (रा. खरपुडी ता जि.जालना) याच्यामार्फत तसेच वैष्णवी लॉजचे मॅनेजर कैलास रतन कुमार (रा. सावा ता. जि चित्तोडगड राज्य राजस्थान.) यांच्यासह ग्राहक आरोपी (वैष्णवी लॉजमध्ये) पंकज भाऊसाहेब निकाळजे, रोहीत संजय बोर्डे,करण रवी वाहुळे तुषार हरिश बत्रा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे ८१ हजार ७५० रुपये असा मुद्देमाल रोख रक्कम व साहीत्य आढळले आहे. ते जप्च करण्यात आले आहे.
१३ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी पश्चिम बंगाल राज्यातील ६ तसेच आसाम राज्याच्या ०३ व छत्रपती संभाजीनगर येथील ४ पिडीत महिला आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात महीलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३,४,५,६ प्रमाणे प्रभारी अधिकारी कक्ष पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.






























































