
मध्यपूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावाचा थेट परिणाम जागतिक बाजारपेठेवर होऊ लागला आहे. अमेरिका आणि इराणमधील संबंध ताणले गेल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींनी सहा महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. या दरवाढीमुळे आता हिंदुस्थानातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत वाढून 71.99 डॉलर्स प्रति बॅरलच्या पार गेली आहे. तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) सुमारे 67.05 डॉलर्सवर पोहोचला. गेल्या सहा महिन्यांत कच्च्या तेलाने गाठलेली ही सर्वोच्च पातळी आहे. इस्रायल आणि हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढल्याने पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, ज्याचा परिणाम किमतींवर होत आहे.
सध्याच्या परिस्थितीत तेल विपणन कंपन्या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे नफा टिकवून ठेवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्री दरात वाढ करण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


























































