
व्हाट्सअॅपच्या ग्रुप चॅट्समध्ये अनेकदा गोंधळ असतो. एखादा मेंबर ग्रुपमध्ये उशिरा सामील झाला की त्याला ग्रुपमध्ये कोणत्या विषयावर काय चर्चा सुरू आहे समजत नाही. त्यावर उपाय म्हणून व्हाट्सअॅप आता ‘ग्रुप मेसेज हिस्ट्री’ फीचर घेऊन येत आहे. या फीचरमुळे अॅडमिन त्याच्या ग्रुपमध्ये जॉईन झालेल्या नवीन सदस्याला 100 पर्यंतच्या मेसेजची हिस्ट्री पाठवू शकतात, जेणेकरून नव्या सदस्याला ग्रुपमध्ये ‘काय चाललं आहे?’ असा प्रश्न विचारण्याची गरजच पडणार नाही.
‘ग्रुप मेसेज हिस्ट्री’ फीचर स्वयंचलित नाही, ते वापरण्याचा पूर्ण अधिकार युजर्सकडे आहे. एंड-टू-एंड एन्क्रिप्शनमुळे गोपनीयतेवरही कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा केला जात आहे. कामासाठी, कुटुंबासाठी किंवा समुदायांसाठी ग्रुप चॅट्स महत्त्वाचे असतात; या फीचरमुळं त्यांचं समन्वय अधिक सोपं होणार आहे.
- नवीन मेंबर जोडताना अॅडमिन किंवा मेंबर 25 ते 100 अलीकडील मेसेज निवडून पाठवू शकतो. हे मेसेज नवीन मेंबरला स्वतंत्रपणे दिसतात, त्यात टाइमस्टॅम्प आणि पाठवणाऱ्याचे नाव असते. ते सामान्य मेसेजेसारखे दिसत नाहीत, त्यामुळे गोंधळ होणार नाही.
- ‘ग्रुप मेसेज हिस्ट्री’ फीचर स्वयंचलित नाही. ते वापरणे पूर्णपणे पर्यायी आहे. अॅडमिनना ग्रुपसाठी हे फीचर बंद करण्याचा अधिकार आहे, पण स्वतः अॅडमिनला नेहमी मेसेज हिस्ट्री पाठवता येईल. ग्रुपमध्ये जेव्हा हिस्ट्री पाठवली जाते, तेव्हा सर्व मेंबर्सना त्याची सूचना मिळते. हे फीचर ग्रुप्स, कुटुंब चॅट्स, इव्हेंट प्लॅनिंग किंवा समुदायांच्या समन्वयासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.































































