ICC T20 WC 2026 – ‘सुपर एट’च्या महाभारतात अपराजितांची कुस्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुपर एटमध्ये पोहोचल्यावर क्रिकेट म्हणजे साधा खेळ राहत नाही. तो बुद्धिबळ, कबड्डी आणि बॉक्सिंग यांचा एकत्रित प्रयोग होतो. सुपर एटमध्ये पोहोचणारा हिंदुस्थान अपराजित आहे. होय, पण इथे अपराजित असणं म्हणजे फक्त बोर्डावर ‘शून्य पराभव’ लिहिलेला असतो. खरा फॉर्म मात्र आता दाखवायचा आहे. कारण योगायोग असा की, स्पर्धेतल्या वीस संघांतून जे चार संघ अपराजित आहेत (म्हणजे एकही सामना हरलेले नाहीत) ते चौघेही हिंदुस्थानच्याच गटात आहेत. म्हणजेच हा गट महाभारतासारखा झालाय. इथे अपराजितांची कुस्ती रंगणार.

सुपर एटच्या पहिल्या गटात हिंदुस्थान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज या तिघांनी विजयी चौकार ठोकलेत. झिम्बाब्वेचं गणित थोडं वेगळं. त्यांनी सलग चार सामने जिंकले नाहीत. कारण आयर्लंडविरुद्धचा सामना पावसाने धुतला. क्रिकेटमध्ये पाऊस हा एकमेव गोलंदाज आहे, ज्याला कोणी बाद करू शकत नाही. पण आकडे सांगतात हा गट म्हणजे ‘मृत्यू गट’. इथे एक चूक म्हणजे थेट गळफास. तो कुणाचाही गळा आवळू शकतो.

दुसऱया बाजूला पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका आणि इंग्लंड हे एकेक पराभव घेतलेले संघ एकमेकांशी भिडणार. म्हणजे एका हातात तलवार आणि दुसऱया हातात पॅलक्युलेटर. कारण इथे एक पराभव उपांत्य फेरीच्या स्वप्नाला सुरुंग लावू शकतो आणि शेवटी जर सगळे गुण सारखे झाले तर ‘नेट रनरेट’ नावाचं भूत रात्री उशिरा येऊन कोणाचं तरी स्वप्न उचलून नेणार. हे वेगळं सांगायची गरज नाही.

बारा लढतींचा थरार

सुपर एट म्हणजे बारा लढतींचं महायुद्ध. प्रत्येक सामना ‘करो या मरो’. इथे बचावात्मक क्रिकेटला नो एण्ट्री. प्रत्येक संघ आपली शेवटची ऊर्जा, शेवटचा डाव, शेवटची कल्पकता पणाला लावणार. कारण आठपैकी पाच संघ माजी जगज्जेते आहेत. अनुभव, अभिमान आणि अहंकार यांची बॅग घेऊन ते मैदानात उतरलेत. त्यात हिंदुस्थान, वेस्ट इंडीज आणि इंग्लंड दोनदा जगज्जेते ठरलेत. श्रीलंका आणि पाकिस्तान हे एकदा मुकुट मिरवलेले संघ. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे हे अजूनही ‘पहिल्या प्रेमाची’ वाट पाहताहेत. दक्षिण आफ्रिकेचा इतिहास सांगतो, ते जवळ येतात आणि नशीब रुसतं. झिम्बाब्वेची कहाणी वेगळी आहे. कारण ते पहिल्यांदाच या उत्तुंग शिखरावर पोहोचलेत. त्यामुळे ते इतरांना दम देतात की त्यांना दम लागतो, ते कळेलच.

ICC T20 WC 2026 – हिंदुस्थानची आता खरी कसोटी, अश्विनने दिला इशारा

आता प्रश्न उरतो की, हिंदुस्थान जेतेपद राखून राजा ठरणार? की वेस्ट इंडीज-इंग्लंड तिसऱयांदा मुकुट चढवणार? की दक्षिण आफ्रिका-झिम्बाब्वेचं स्वप्न यंदा प्रत्यक्षात उतरणार? हे टी-20 क्रिकेट आहे. इथे चेंडू लहान, सामना लहान, पण धक्का मात्र मोठा असतो. एका षटकात इतिहास लिहिला जातो आणि दुसऱया षटकात तो पुसलाही जातो. त्यामुळे सर्वांनी सीटबेल्ट बांधावी. सुपर एटचा हा प्रवास सरळ रस्त्यावरचा नाही. हा रोलर-कोस्टर आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्याचा क्लायमॅक्स थ्रिलर असणार.