ठाण्यात 25 हजार कुत्र्यांना रेबीजची लस; पालिकेची 50 जणांची टीम आजपासून रस्त्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने मिशन रेबीजमुक्त ठाणे ही मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत उद्यापासून एक महिना तब्बल २५ हजार कुत्र्यांना रेबीजची लस टोचण्यात येणार आहे. यासाठी ५० जणांची टीम रस्त्यावर उतरणार आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दिव्यातील पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला होता. यावरून पालिकेवर टीकेची झोड उठल्यानंतर खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे.

ठाण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. कचराकुंड्या, रस्ते, सार्वजनिक आस्थापने, बगीचे तसेच गल्लीबोळात हे कुत्रे टोळक्याने उभे राहतात. तसेच खेळणारी लहान मुले, पादचारी यांच्यावर अचानक भुंकणे तसेच हल्ला करतात. काही ठिकाणी या भटक्या कुत्र्यांनी नागरिकांचे लचके तोडल्याच्या घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. त्यामुळे लहान मुले, महिला व वृद्ध नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दिव्यातील पाच वर्षीय चिमुकली भावासोबत खेळण्यासाठी इमारतीतून खाली उतरली असता भटक्या कुत्र्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला होता. या सर्व घटना नियंत्रणात आणण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने प्राणीमित्र संस्थांच्या मदतीने ‘रेबीजमुक्त ठाणे’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ व फलकाचे अनावरण महापालिकेत करण्यात आले. यावेळी महापालिका उपायुक्त मनीष जोशी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर तसेच रेबीजमुक्त मोहिमेसाठी नियुक्त केलेले पथक उपस्थित होते.

५० जणांच्या विशेष पथकाच्या माध्यमातून ७ दिवसांत ५००० भटक्या कुत्र्यांना रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे. महिनाभरात २५ हजार भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून पुढील काळातही ही मोहीम सातत्याने राबवण्यात येणार आहे. तसेच लसीकरण केलेल्या भटक्या कुत्र्यांची ओळख पटावी यासाठी त्यांच्या गळ्यात केशरी रंगाचा रिफ्लेक्टर पट्टा बांधण्यात येणार आहे.

डॉ. प्रसाद पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी.