
अनधिकृत होर्डिंगमुळे एका सफाई कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी संजयनगर भागात हनुमान मंदिर परिसरात ही घटना घडली. अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी गेलेल्या सफाई कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी घडली. यावेळी त्याच्यासोबत असलेला दुसरा कामगार जखमी झाला आहे.
संजयनगर मुकुंदवाडी भागातील हनुमान मंदिरावर लावण्यात आलेले होर्डिंग काढत असताना सफाई कामगार अमोल दिनकर जाधव (वय २७ ) याचा विजेच्या तारेला स्पर्श झाला. यामुळे अमोल जाधव हा होरपळला आणि मृत्यू झाला. यावेळी त्याच्यासोबत असलेला आणखी एक कामगार रवींद्र रणधीर रिडलॉन हा जखमी झाला आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील होर्डिंगवरून महापौर आणि आयुक्तांमध्ये मोठा वाद झाला होता. बेकायदेशीर होर्डिंग हटवण्याचे आदेश महापौरांनी दिले होते. मात्र, आयुक्तांनी सांगितले की होर्डिंग हटवायला गेलो की कुणाकुणाचे फोन येतात हे सांगू का? यावरून चांगलीच चर्चा रंगली होती.
अनधिकृत होर्डिंगमुळे मुंबईत घाटकोपरमध्ये जुलै २०२४ ला मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेत होर्डिंग कोसळून १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर ७४ जण जखमी झाले होते. या घटनेनंतर राज्यातील अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा तापला होता. पण त्यानंतरही अनधिकृत होर्डिंग लावले जात आहेत. आणि अशा होर्डिंगमुळे नाहक बळी जात आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या घटनेनंतर अनधिकृत होर्डिंगवर आणि त्यांच्याशी संबंधितांवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.




























































