
छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या लोहमार्ग पोलीस भरती प्रक्रियेला शनिवारी एका दुर्दैवी घटनेने गालबोट लागले. मैदानी चाचणी सुरू असताना सांगली जिल्ह्यातील एका 23 वर्षीय उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
नेमकी घटना काय?
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील मोराळे येथील संग्राम धोंडीराम शिंदे (वय 23) हा तरुण पोलीस भरतीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आला होता. टीव्ही सेंटर भागातील गोकुळ मैदानावर शनिवारी सकाळी लोहमार्ग पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होती.
मैदानी चाचणीसाठी मैदानात उतरल्यानंतर काही वेळातच संग्रामला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळ न घालवता त्याला रुग्णवाहिकेतून शासकीय घाटी रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक स्तरावर सांगण्यात येत आहे.
आपल्या खांद्यावर खाकी वर्दी असावी, हे स्वप्न उराशी बाळगून संग्रामने सांगली ते छत्रपती संभाजीनगर असा सुमारे 450 किलोमीटरचा प्रवास केला होता. अत्यंत जिद्दीने तो या भरतीसाठी सराव करत होता. मात्र, प्रत्यक्ष मैदानात उतरल्यावर नियतीने त्याच्यावर घाला घातला आणि एका होतकरू तरुणाचे पोलीस होण्याचे स्वप्न कायमचे अधुरे राहिले. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.





























































