गरीब महिलांना अंडाशयामागे 20 हजार तर दलालांना 3 हजार रुपये कमिशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सागर कदम

गोरगरीब महिलांची फसवणूक करून त्यांच्या अंडाशयांचा सौदा करणाऱ्या सरोगसी कांडाचे देशभरात धागेदोरे पसरले असल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. शेकडो गरजू महिलांना हेरून त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेत एका अंडाशयामागे २० हजार तर या महिलांना आणणाऱ्या दलालांना तीन हजार रुपये दिले जात होते. गेल्या अनेक वर्षांपासून हे रॅकेट सुरू असताना पोलिसांना मात्र कोणतीही माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुलींवरील अत्याचार, त्यापाठोपाठ सरोगसी कांड यामुळे दिवसेंदिवस बदलापूर ‘क्राईम’पूर होत असून पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचा संताप व्यक्त होत आहे.

बदलापुरातील एका पीडित महिलेने उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्व प्रकार सांगितल्यानंतर या भयंकर कांडाचा भंडाफोड झाला. याची गंभीर दखल घेत डॉक्टरांनी बदलापूर पूर्व व पश्चिम या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी रात्री जोवेली गावात छापा टाकून सुलक्षणा गाडेकर व तिची उल्हासनगरातील साथीदार अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे अशा तिघांनाही बेड्या ठोकल्या. आरोपींची सध्या कसून चौकशी सुरू असून नवनवीन धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. अंडाशय तस्करीमागे आंतरराज्य टोळी असण्याचा दाट संशय असून काही बडे डॉक्टर्स व दलालांचा समावेश असल्याची जोरदार चर्चा आहे. या रॅकेटमध्ये देशभरातील ३०० हून अधिक महिलांची फसवणूक झाल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

डॉक्टर कटरा मुख्य सूत्रधार? त्याचा आधी शोध घ्या !

सरोगसी कांडात अटक केलेल्या सुलक्षणा वर्मा हिचा पती संजय वर्मा यांनी आपल्या पत्नीवर झालेले आरोप चुकीचा असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आमच्या घरात कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन सापडले नसून १० ते १५ पोलिसांनी घरात घुसून माझ्या पत्नीला ताब्यात घेतल्याचे सांगितले. डॉक्टर कटरा या प्रकरणाचा खरा सूत्रधार असून त्याचा आधी शोध पोलिसांनी घ्यावा असे संजय वर्मा यांनी सांगितले.

महिलांच्या अब्रूचे धिंडवडे; पोलीस सपशेल अपयशी

बदलापुरात एका नामवंत शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर झालेले लैंगिक अत्याचार प्रकरण देशभरात गाजले. पीडित मुलींचे आईवडील पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले तेव्हा त्यांची तक्रार न घेता त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यावेळी हजारो बदलापूरकरांनी रेल रोको आंदोलन केले होते. अवघ्या काही दिवसांपूर्वीच स्कूल व्हॅनमध्येही एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्यानंतर शिकवणीसाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा एका रिक्षाचालकाने हात धरून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. आता तर थेट गरजू महिलांच्या गर्भाशयातील अंडाशये पळवणारी टोळीच बदलापुरात सक्रिय झाली आहे. एकीकडे बदलापुरात महिलांच्या अब्रूचे धिंडवडे निघत असताना पोलीस मात्र अपयशी ठरल्याचे चित्र समोर आले आहे.