
लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भिवंडी कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे नवे जामीनदार असणार आहेत. राहुल गांधी यांनी स्वतः आज भिवंडी न्यायालयात हजर राहत जामिनासंदर्भात दिलेल्या नव्या कागदपत्रांसह बाँड पेपरवर सह्या केल्या. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ एप्रिल रोजी होणार आहे.
२०१४ मध्ये भिवंडीच्या सोनाळे येथे प्रचार सभेदरम्यान महात्मा गांधींच्या हत्येस आरएसएस जबाबदार असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. याविरोधात संघाचे तत्कालीन शहर कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात याचिका दाखल करत आरएसएसची बदनामी केल्याचा दावा केला होता. या प्रकरणात राहुल गांधी यांना माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर हे जामीनदार राहिले होते. मात्र त्यांचे आता निधन झाल्याने नवीन जामीनदार सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आज राहुल गांधी सकाळी ११ वाजता भिवंडी अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर झाले. तेथे न्यायाधीश पी. एम. कोळसे यांच्यासमोर नवीन जामीनपत्रावर राहुल गांधी व जामीनदार म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांनी सह्या केल्या अशी माहिती राहुल गांधी यांचे वकील अॅड. नारायण अय्यर यांनी दिली आहे. यावेळी खासदार सुरेश म्हात्रे, आमदार रईस शेख यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपचा केला निषेध
राहुल गांधी यांचा ताफा कोर्टाच्या दिशेने येत असताना मुलुंड टोलनाक्यावर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. यावरून काँग्रेस नगरसेवक प्रशांत लाड यांनी टीका करत कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना भररस्त्यात भाजपचे कार्यकर्ते झेंडे घेऊन येतात कसे, असा सवाल केला. याबाबत सरकार व पोलीस प्रशासनाचा निषेध करत असल्याचादेखील त्यांनी सांगितले.
























































