
तेलंगणातील कामारेड्डी येथे जमिनीच्या वादावरून राज्य सरकारचे सल्लागार मोहम्मद अली शब्बीर आणि भाजप आमदार के. व्यंकट रमण रेड्डी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या चकमकीनंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. भाजप आमदाराच्या कॅम्प ऑफिसजवळ शनिवारी ही घटना घडली.
अली शब्बीर यांनी भाजप आमदारावर जमीन बळकावल्याचा आरोप केला होता. हा आरोप फेटाळून लावत रमण रेड्डी यांनी काँग्रेस नेत्याला खुल्या चर्चेचे आव्हान दिले होते. यावेळी माजी सरपंच आणि काँग्रेस नेते गिरी रेड्डी महेंद्र रेड्डी समर्थकांसह तिथे जमा झाले आणि त्यांनी “आमदार डाऊन-डाऊन” अशा घोषणा दिल्या. गोंधळ सुरू असताना महेंद्र रेड्डी यांच्या कारची तोडफोड करून ती उलटवण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.
VIDEO | Telangana: Congress, BJP workers clash over a dispute related to the assets of a government degree college in Kamareddy.
(Full video available on https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/mZ9Ind1NPM
— Press Trust of India (@PTI_News) February 21, 2026
भाजपचे प्रदेशाध्यक्ष एन. रामचंद्र राव यांनी या घटनेचा निषेध केला. कामारेड्डी येथील भाजप आमदाराच्या कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेला हा भयंकर हल्ला धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. लोकशाहीत अशा राजकीय हिंसेला स्थान नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, राव यांना कामारेड्डीला जाण्यापूर्वीच हैदराबादमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले. तर दुसरीकडे, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून या हिंसाचाराची सखोल चौकशी करण्याची आणि शांतता राखण्याची मागणी केली आहे.
कामारेड्डीचे पोलीस अधीक्षक एम. राजेश चंद्र यांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून दोषींच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. बान्सवाडा येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे जिल्ह्यात आधीच तणाव असून, खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

























































