
>> कल्पेश गोरडे
महापालिका निवडणुका झाल्याने आता ठाणेकरांच्या खिशावर डल्ला मारण्याचा डाव आहे. महापालिकेने विद्यार्थी, महिला, दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी टीएमटीच्या तिकीट दरात विविध सवलती दिल्या आहेत. मात्र सवलतींचा हा भार टीएमटीला असह्य झाला असून लवकरच तिकीट दरात ३ ते ५ रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील तिकीट ७रुपयांवरून १० रुपये होण्याची शक्यता आहे. बेस्टच्या धर्तीवर दरवाढीची परवानगी मिळावी यासाठी परिवहन विभाग पालिकेकडे मागणी करणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याच्या हालचाली सुरू आहेत.
महापालिकेकडून परिवहन प्रवाशांसाठी विशेष सवलती लागू केल्या. मात्र या सवलतींमुळे परिवहन विभागाला महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहण्याची वेळ आली होती. यावर तोडगा म्हणून परिवहन विभागाने टीएमटी मार्गांची पुनर्रचना केली. कमी प्रवासी असलेल्या मार्गांवरील फेऱ्या रद्द करून त्या बसेस गर्दीच्या मार्गांवर वळवल्या. फुकट्या प्रवाशांना चाप लावण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. या सर्व उपाययोजनांमुळे परिवहनच्या दैनंदिन उत्पन्नात सात लाखांची वाढ झाली आहे. प्रतिदिन २३ लाखांवरील उत्पन्न ३० लाखांवर येऊन पोहोचले आहे. मात्र असे असूनही खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने दरवाढ करण्याची वेळ परिवहन विभागावर आली आहे.
उत्पन्नापेक्षा खर्च जास्त
टीएमटीचे वार्षिक उत्पन्न साधारण ९० ते ९५ कोटी रुपयांचे आहे. मात्र बससेवा चालवण्यासाठी होणारा एकूण वार्षिक खर्च ३५० कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. यामध्ये आस्थापना खर्च १५० कोटी रुपये, बस परिचालन १०० कोटी रुपये, ई-बस प्रकल्प ५० कोटी रुपये, तसेच इंधन, वीज, देखभाल-दुरुस्ती यासारख्या आवश्यक खर्चाचा समावेश आहे.
११ वर्षांनंतर दरवाढ
२०१५ मध्ये ठाणे परिवहन सेवेच्या तिकीट दरात वाढ झाली होती. त्यानुसार सामान्य बससेवेमध्ये २ ते ५ रुपये आणि एसी बसमध्ये ५ ते १० रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र बेस्टच्या तुलनेत टीएमटीचे तिकीट दर जास्त असल्याने २०२३ मध्ये एसी बसच्या तिकीट दरात ४० ते ५० टक्क्यांची कपात केली होती. तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना लागू केल्या होत्या. मात्र आता त्याचा भार सहन होत नसल्याने ११ वर्षांनंतर ठाणे परिवहन विभाग तिकीट दरात वाढ करणार आहे.

























































