मेतके चोरीतील 40 तोळे सोन्याचा सात दिवसांत छडा, कर्नाटकातून एकास अटक; 53 लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कागल तालुक्यातील मेतके येथे सद्गुरू बाळूमामांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या मोटारीची काच फोडून 40 तोळे सोने, चांदीचे दागिने व रोख 50 हजारांसह सुमारे 29 लाख 73 हजारांची चोरी करणाऱया चोरटय़ाच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला यश आले. अवघ्या सात दिवसांत गुन्हे अन्वेषण विभागाने परराज्यातील या चोरीचा छडा लावला.

कर्नाटक राज्यातील दावणगेरे येथून वीरेश नागाज्याराप्पा (वय 44, रा. दुर्ग अंबिका मंदिरजवळ, दावणगेरे, ता. जि. दावणगेरे, कर्नाटक) यास अटक केली. त्याच्याकडून सोने-चांदीच्या दागिन्यासह कार, मोबाईल असा 53 लाख 42 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा भागातील मेतके येथे बाळूमामाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात. 13 फेब्रुवारी रोजी क्रेटा मोटारीने पुणे येथे वास्तव्यास असलेले वृषाली विजयकुमार धुमाळ, त्यांची आई, दोन बहिणी व तिचा पती मेतके येथे दर्शनासाठी आले होते. सायंकाळी मंदिरानजीक मोटार पार्क करून दर्शनासाठी गेले होते. दर्शनावरून परत आल्यानंतर गाडीची काच फोडून दागिन्यांची बॅग पळवल्याचे लक्षात आले. त्यानंतर वृषाली धुमाळ यांनी मुरगूड पोलिसांत फिर्याद
दिली होती.

पोलिसांनी गुन्ह्याच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीच्या विश्लेषणद्वारे तपास सुरू होता. या पथकातील पोलीस अंमलदार महेश खोत, रोहित मर्दाने, विजय इंगळे यांना हा चोरटा एस. एस. हॉस्पिटल, दावणगेरे, कर्नाटक येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने गुरुवारी (दि. 19) दावणगेरे येथे सापळा लावून चोरटय़ास जेरबंद केले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरीची कबुली दिली.

पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर अधीक्षक बी. धीरजकुमार, उपविभागीय अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक संतोष गळवे, जालिंदर जाधव, राजू कांबळे, सागर माने, योगेश गोसावी, संजय कुंभार, अमित सजे, राजेश राठोड, महेश खोत, विजय इंगळे, रोहित मर्दाने, संदीप बेंद्रे, संजय हुंबे, संजय पडवळ, सागर चौगले, सुशील पाटील, सतीश सूर्यवंशी, अनिल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.