
ओडिशाच्या झारसुगुडा जिल्ह्यात रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. एका भरधाव ट्रेलरने पोलिसांच्या बोलेरो गाडीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात पहाटेच्या सुमारास झारसुगुडा सदर पोलीस ठाण्याजवळ झाला. पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना समोरून वेगात येणाऱ्या ट्रेलरने पोलिसांच्या गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बोलेरोचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात पाच कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. काशीराम भोई, देबदत्त सा, निरंजन कुजूर, लिंगराज धुरूआ आणि भक्तबंधू मिर्धा अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे पोलीस दलात आणि स्थानिक परिसरात शोककळा पसरली आहे.
या अपघातात दोन सशस्त्र पोलीस राखीव (एपीआर) कर्मचारी आणि एका सार्जंटचा समावेश आहे. त्यांना स्थानिक पोलिसांनी वाचवून तातडीने झारसुगुडा जिल्हा मुख्य रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
#WATCH | Jharsuguda, Odisha | Five police personnel died following a collision between a trailer and a police SUV near Jharsuguda Sadar Police Station on National Highway 49. The injured have been admitted to the hospital: Jharsuguda SP Gundala Reddy Raghavendra pic.twitter.com/8j9G0jlUA0
— ANI (@ANI) February 22, 2026
दरम्यान, पोलिसांनी ट्रेलर चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्याची पाहणी केली.


























































