दादर मेट्रो स्टेशनवरील वातनुकूलन यंत्रणा बंद; भूमिगत स्टेशनात प्रवासी घामाघूम, अपुऱ्या पाणीपुरवठय़ाचा फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई मेट्रो लाईन तीन म्हणजे जेव्हीएलआर ते कफ परेड भुयारी मेट्रो रेल्वेच्या मध्यवर्ती दादर मेट्रो रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील एसी यंत्रणा मागील तीन दिवसांपासून बंद पडली आहे. त्यामुळे  मेट्रो रेल्वेचे प्रवासी आणि भूमिगत स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर काम करणारे कर्मचारी घामाघुम होत आहेत.

मेट्रो रेल्वे मार्ग तीनला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. संपूर्णपणे भूमिगत, वेळेत बचत  आणि गारेगार प्रवास असल्यामुळे सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसांत प्रवाशांनी प्रवासासाठी मेट्रो रेल्वेला पसंती दिली आहे. पण मागील तीन दिवसांपासून दादर मेट्रो रेल्वे स्टेशनमधील एसी यंत्रणा पूर्णपणे बंद पडली आहे. अनेक प्रवाशांनी दादर स्टेशनमधील संबंधित कर्मचाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. दादर रेल्वे स्टेशनमधील ‘ऑपरेशन डिपार्टमेंट’ मार्फत मेट्रोच्या मुख्यालयात एसी यंत्रणा तीन दिवसांपासून बंद असल्याचे कळवले आहे. पण दादर भागात अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे एसी यंत्रणेला पुरेसा पाणीपुरवठा करता येत नसल्याचे उत्तर मेट्रोच्या मुख्यालयातून देण्यात आल्याचे समजते. दादर मेट्रो रेल्वेमध्ये एसी यंत्रणेसाठी सुमारे अडीच हजार लिटरची पाण्याची टाकी आहे. पण पाणीपुरवठा होत नसल्यामुळे एसी यंत्रणा बंद पडल्याचे सांगण्यात येते.