
अंतर्गत बंडाळीने ग्रासलेल्या पाकिस्तानी लष्कराने आज आपला राग अफगाणिस्तानवर काढला. पाकिस्तानी लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या हद्दीत हवाई हल्ले केले असून त्यात महिला व मुलांसह सुमारे 18 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानचे तालिबान सरकार खवळले असून या हल्ल्याचा पुरेपूर बदला घेऊ, अशी धमकी तालिबानने दिली आहे.
‘अफगाण सीमेला लागून असलेल्या पाकच्या खैबर पख्तुख्वा प्रांतात शनिवारी आत्मघाती हल्ला झाला होता. त्यात पाकिस्तानी लष्कराचे दोन जवान मारले गेले. त्यास प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने टीटीपीच्या सात तळांना लक्ष्य केले. त्यात टीटीपीचे 28 दहशतवादी मारले गेल्याचा दावा पाकिस्तानने केला. अफगाणिस्तानने हा दावा साफ फेटाळून लावला. पाकिस्तानने नागरी वसाहतींना लक्ष्य केले असून त्यात अनेक निष्पाप नागरिक मारले गेले आहेत. नंगरहर आणि पक्तिका प्रांतातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे,’ असे तालिबान सरकारने म्हटले आहे.
अपयश लपवण्यासाठी खटाटोप
अफगाणिस्तान सरकारने पाकिस्तान लष्करावर टीकेची तोफ डागली आहे. ‘पाकिस्तानमध्ये अंतर्गत अराजक माजले आहे. तेथील राष्ट्रीय संस्था आणि धार्मिक स्थळांवर सातत्याने हल्ले होत आहेत. हे सगळे रोखण्यात पाकिस्तानी लष्कराला अपयश आले आहे. ते लपवण्यासाठीच त्यांनी अफगाणिस्तानच्या हद्दीत हल्ले केले आहेत. हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग आहे. अशा हल्ल्यांनी पाकिस्तान अंतर्गत बंडाळी लपवू शकणार नाही, अशी खोचक टीका तालिबानने केली आहे. पाकिस्तानच्या आगळिकीला योग्य वेळी योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, असे अफगाणी संरक्षण मंत्रालयाने ठणकावले आहे.

























































