
स्पर्धेपूर्वी कमी लेखलेल्या, दुय्यम समजलेल्या, कागदावर कमकुवत असलेल्या झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज या अपराजित संघांमध्ये ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर सुपर एटचे तुंबळयुद्ध रंगणार आहे. या दोन्ही संघांनी साखळी सामन्यात अनपेक्षित आणि जिगरबाज खेळ दाखवल्यामुळे टी-20 वर्ल्ड कपचा हा सामना थराराची मेजवानी घेऊन येणार हे नक्की. दोघेही अंडरडॉग असले तरी आव्हानवीर आहेत. कोणता संघ आपल्या नॉनस्टॉप विजयाचा किल्ला अभेद्य राखतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
झिम्बाब्वेने या स्पर्धेत अपराजित राहून अनेक विश्लेषकांचे अंदाज चुकवले आहेत. ब्रायन बेनेटने अव्वल फळीत 120 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने खणखणीत सलामी दिली आहे, तर तदिवानाशे मारुमानीनेही त्याला जबरदस्त साथ दिलीय. मधल्या फळीत कर्णधार सिकंदर रझा हा संघाचा कणा ठरलाय. धावा, नियंत्रण आणि अष्टपैलू कामगिरी या तीनही क्षेत्रांचा सिकंदर असल्याचे त्याने दाखवून दिलेय. गोलंदाजीत ब्रॅड इव्हान्स आणि ब्लेसिंग मुजरबानी यांनी वेग आणि लेंथ बदलत प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत टाकलेय. त्यामुळे झिम्बाब्वेचा संघ दिसतो तसा नाहीय, हे आतापर्यंत दिसलेय.
दुसरीकडे त्यांच्यासमोर असलेला वेस्ट इंडीजचा संघही भलताच धोकादायक ठरतोय. शाय होप डाव सावरतोय, रोव्हमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर आणि शेरफेन रदरफोर्ड शेवटच्या षटकांत स्फोट घडवताहेत. शामर जोसेफची वेगवान सुरुवात आणि जेसन होल्डरचा अनुभव हा त्यांचा तुरुप एक्का झालाय. अकील होसेन, गुडाकेश मोती आणि रोस्टन चेस यांची फिरकी फलंदाजांची तारांबळ उडवतेय.
सध्या दोन्ही संघांनी सर्वांची तारांबळ उडवलीय. आता ते एकमेकांची तारांबळ उडवायला उभे ठाकलेत. वानखेडेची खेळपट्टी यावेळी थोडी मंद झालीय. पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 160 ते 170 दरम्यान आहे. पाठलाग करणाऱया संघांना यश मिळाले असल्याने नाणेफेक जिंकणारा कर्णधार आधी गोलंदाजी पसंत करेल. प्रथम फलंदाजी करणाऱया संघाला आपला विजय पक्का करण्यासाठी 200 चा जादुई आकडा गाठावा लागेल. ही लढत असेल निर्धाव चेंडूंच्या दडपणाची आणि हाणामारीच्या षटकांतील तडाख्यांची. झिम्बाब्वे धावांचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न करेल तर वेस्ट इंडीज सामना वेगाने संपवण्याचे लक्ष्य ठेवेल. कागदावर कॅरिबियन थोडे पुढे दिसतात, पण आत्मविश्वासाच्या जोरावर झिम्बाब्वे शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देणार, यात शंका नाही. हे अंडरडॉग असले तरी त्यांचा खेळ वाघासारखा जिगरबाज होतोय.

























































