
साखरपुडा झाल्याच्या चौथ्या दिवशी येरमाळा – वाशी तालुक्यातील नववधू-वराचा सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज रविवारी सकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास रत्नापूर पाटी वळणावर घडली.
वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय रामभाऊ शिनगारे (२५) आणि इजोरा येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया (२३) यांचा गेल्या रविवार, १५ रोजी मांजरसुंबा येथील कन्हैया मंगल कार्यालयात साखरपुडा झाला होता. चारच दिवसांपूर्वी आनंदाच्या वातावरणात पार पडलेल्या या समारंभानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती.
दरम्यान, अक्षया हिची लातूर येथे महापारेषणची परीक्षा असल्याने ती रविवारी पहाटेच वाशी येथून घरची टाटा नेक्सॉन (एम. एच. २५ बीएफ ५०६४) या वाहनातून लातूरकडे निघाली होती. वाहनात अक्षय रामभाऊ शिनगारे आणि चालक अक्षय यादव सिरसट (२२) हेही होते. रत्नापूर पाटीजवळील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट येडशी टोल नाक्याच्या कमानीला धडकली. धडक इतकी भीषण होती की, वाहनाच्या पुढील भागाचा चुराडा झाला. अपघातात अक्षया आणि अक्षय यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमी चालकाला १०८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येरमाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

























































