तेजस विमान अपघातानंतर IAF ची मोठी कारवाई, 30 लढाऊ विमानांची उड्डाणे रोखली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वदेशी बनावटीच्या तेजस लढाऊ विमान अपघातानंतर हिंदुस्थानी हवाई दलाने मोठा निर्णय घेतला आहे. हवाई दलाने 30 तेजस विमानांची उड्डाणे रोखली आहेत. सध्या तेजस अपघाताची चौकशी सुरू आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर विमानांची व्यापक तांत्रिक तपासणी करण्यासाठी हवाई दलाने 30 सिंगल सीटर तेजस विमानांच्या ताफ्याला तात्पुरते ग्राऊंड केले आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, प्रशिक्षण उड्डाणानंतर तळावर परतत असताना ब्रेक फेल झाल्यामुळे 7 फेब्रुवारी रोजी तेजस लढाऊ विमान फ्रंटलाइन एअरबेसवर धावपट्टीवरून घसरले. या अपघातात विमानाच्या फ्यूजलेजला मोठे नुकसान झाले. सुदैवाने पायलट सीट इजेक्शन वापरून सुरक्षितपणे बाहेर पडला.

तिसऱ्यांदा तेजस लढाऊ विमानाच्या अपघातानंतर हिंदुस्थानी हवाई दलाने मोठा निर्णय घेतला. हवाई दलाने व्यापक तांत्रिक चौकशीचे आदेश दिले असून चौकशी पूर्ण होईपर्यंत सुमारे 30 सिंगल-सीट तेजस लढाऊ विमानांचा संपूर्ण ताफा ग्राउंड करण्यात आला आहे.

तेजस लढाऊ विमानाचा पहिला अपघात जैसलमेरजवळ मार्च 2024 मध्ये झाला होता. दुसरी घटना नोव्हेंबर 2025 मध्ये दुबई एअर शो दरम्यान घडली होती. हवाई दलाचे अत्याधुनिक स्वदेशी लढाऊ विमान, एलसीए तेजस, प्रात्यक्षिक उड्डाणादरम्यान कोसळले होते. या अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाला.