विरोधी पक्षनेता नेमला तर सरकारची लक्तरं काढली जातील म्हणून सरकार घाबरतंय; संजय राऊत यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधीमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले असून यंदाही सरकारने विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद दिलेले नाही. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. ”विरोधी पक्ष नेत्याशिवाय अधिवेशन चालवणं ही लोकशाहीची विटंबना आहे. विरोधी पक्षनेता नेमला तर तो संपूर्ण महाराष्ट्रासमोर सरकारची लक्तरं काढेल म्हणून सरकार घाबरतंय”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

”विरोधी पक्षनेते पदावर सरकार चर्चाही करायला तयार नाही. हा कसला अहंकार? महाभारतात असा अहंकार दुर्योधनाला होता. महाभारतात पांडवांनी सहा गावं मागितली. त्यावर दुर्योधन अहंकराने म्हणाला की सहा गावं काय मी तुम्हाला सुईच्या अग्राइतकी जमीन देखील देणार नाही. त्या अहंकारांतून दुर्योधन व कौरवांचा विनाश झाला होता. तशीच भाजप आणि मिंधे गटाची भूमिका आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

”विरोधी पक्षनेता हवा अशी अजित पवारांची भूमिका होती. पण मुख्यमंत्री फडणवीसांना व मिंधे गटाला विरोधी पक्षनेता नकोय कारण त्यांची सगळी लक्तरं बाहेर काढणारा घटनात्मक पदावर येईल व त्याचे महाराष्ट्राला ऐकावे लागेल. म्हणून या सरकारला विरोधी पक्ष नेता दोन्ही सभागृहात नेमायचा नाही. ही लोकशाहीची विटंबना व विडंबना आहे. असेही ते म्हणाले.