
जम्मू आणि कश्मीरमधील अखनूरमध्ये ‘बलून टेरर’ची एक नवीन घटना समोर आली आहे. अखनूर भागातील खौर पोलीस स्टेशन हद्दीतील नीली नाला येथील गुनारा गावात पोलिसांना दोन संशयास्पद फुगे सापडले. प्राथमिक माहितीनुसार या फुग्यांचं पाकिस्तान कनेक्शन उघड झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फुग्यांवर एक पाकिस्तानी मोबाईल नंबर छापलेला होता, तसेच स्कॅनर कोडसारखी छापलेली प्रतिमा होती. घटनास्थळावरून काही पाकिस्तानी आणि अमेरिकन चलनी नोटा देखील जप्त करण्यात आल्या. माहिती मिळताच, पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठत सर्व वस्तू ताब्यात घेतल्या. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हे फुगे कुठून आले आणि त्यावर छापलेले मोबाईल नंबर आणि कोडचा अर्थ काय आहे हे तपास यंत्रणा शोधत आहेत. परकीय चलन कसे आले याचाही तपास सुरू आहे. या घटनेचा सीमापार संबंध आहे का किंवा सीमावर्ती भागात घडलेल्या अशाच घटनांशी त्याचा संबंध आहे का, याचाही तपास सुरक्षा यंत्रणा करत आहेत. जप्त केलेल्या वस्तूंची प्राथमिक तपासणी आणि तांत्रिक विश्लेषण केल्यानंतरच संपूर्ण सत्य समोर येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक प्रशासनाने जनतेला सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद वस्तू किंवा हालचालींची त्वरित माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.

























































