रशियाचा युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला, ऊर्जा प्रकल्पाला केले लक्ष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस अधिक हिंसक होत असून, रशियाने रविवारी युक्रेनच्या विविध शहरांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मोठा वर्षाव केला. या भीषण हल्ल्यात एका महिला पोलीस अधिकाऱ्यासह दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. रशियाने प्रामुख्याने युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधा आणि नागरी वस्त्यांना लक्ष्य केल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने या मोहिमेत क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह शेकडो ड्रोनचा वापर केला. राजधानी कीव्हसह ओडेसा, लवीव, निप्रो आणि सुमी या शहरांना रशियन सैनिकांनी लक्ष्य केले. लवीव शहरात झालेल्या स्फोटात एका पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर २४ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. कीव्हच्या बाहेरील भागातही एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला असून निवासी इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. “रशियाला शांतता नको असून त्यांना केवळ विनाश घडवून आणायचा आहे,” असे त्यांनी म्हटले. थंडीच्या कडाक्यात युक्रेनमधील ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करून नागरिकांना अंधारात आणि थंडीत ढकलण्याचा रशियाचा डाव असल्याचेही त्यांनी म्हटले. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण युक्रेनमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.