
रत्नागिरी शहरात रहाणाऱ्या नागरिकांच्या डोक्यावर कराचा बोजा वाढणार आहे. 32 पैकी महायुतीचे 29 नगरसेवक निवडून देणाऱ्या रत्नागिरीकरांना सत्ताधाऱ्यांनी करवाढीचं रिटर्न गिफ्ट दिले आहे. सोमवारी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा करवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांवर दिवाबत्ती कर आणि अग्निशमन कराचा भार वाढणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी या जाचक करवाढीला विरोध केला आहे.
रत्नागिरी नगर परिषद नियोजनाअभावी तोट्यात गेली आहे. नगरपरिषदेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नागरिकांवरच कराच्या रूपाने भुर्दंड लावला जाणार आहे. रत्नागिरी नगर परिषदेने 2 टक्के दिवाबत्ती कर आणि दोन टक्के अग्निशमन कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात नागरिकांना अधिक कर भरावा लागणार आहे.
स्वच्छता कर स्थगित
रत्नागिरी नगर परिषद अग्निशमन कर, दिवा बत्ती कर आणि स्वच्छता कर आकारत नव्हती.आर्थिक तोट्यातून बाहेर पडण्यासाठी नगर परिषदेने हे तीनही कर आकारण्याचा प्रस्ताव आजच्या सर्वसाधारण बैठकीत मांडला होता. स्वच्छता कर हा महिन्याला प्रत्येक घरापोटी तीस रूपये आहे.नगरसेवकांनी चर्चा केल्यानंतर अखेर स्वच्छता कराचा विषय स्थगित ठेवण्यात आला आहे.
शिवसेना नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
आजची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी वैभव गारवे यांना निवेदन देऊन करवाढीला विरोध केला आहे.आजच्या सभेतील विषय क्र.१६ रत्नागिरी शहरात अग्निशमन कर लागू करणे आणि विषय क्र.स्वच्छता कर लागू करणे या दोन्ही जाचक कर वाढीला आमचा विरोध आहे अशी भूमिका नगरसेवक केतन शेट्ये,अमित विलणकर आणि फौजिया मुजावर यांनी मांडली.



























































