
लातूर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सोमवारी अवकाळी पावसासह काही ठिकाणी चांगलीच गारपीट झाली आहे. काढणीला आलेल्या पिकांचे यामुळे नुकसान होत आहे.
रेणापूर तालुक्यातील पानगाप येथे गारांसह २० मिनिटे पाऊस झाला. अहमदपुर शहर व तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ परिसरात रविवारी रात्री हलक्या सरी कोसळल्या. सध्या परिसरात पुन्हा मोठ्या प्रमाणात आभाळ दाटून आले आहे. जोराचा वारा सुरू होता जवळपास १० मिनिटे पाऊस झाला. शिरूर अनंतपाळ येथे ही जोरदार वारे आणि पाऊस झाला. गुडसुर परीसरात रिमझिम पाऊस सुरुवात झाली आहे. उदगीर तालुक्यातील ढगाळ वातावरण होते. येरोळ येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. निलंगा व परिसरात मेघ गर्जनेसह दमदार पावसाला सुरुवात झाली होती.
अहमदपूर तालुक्यातील किनगाव आणि परिसरात काल दुपारी तीन वाजले पासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्या मुळे बराच वेळ वीज पुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या गडगडाटासह अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने जोरदार थैमान घातल्याने ऊभी पिके जमीनदोस्त झाली. काढणीला आलेले हरभरा, गहू, ज्वारीसह भाजी पाल्याचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिसरात दुपारनंतर जोरदार वादळी वाऱ्याने थैमान घातल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. सध्याला ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमे चालू असून अचानक आलेल्या वादळी पावसाने त्या मध्ये व्यत्यय आणल्याने भाविक भक्तांमध्ये ही धावपळ उडाली.
वादळी वाऱ्यासह थैमान घातलेल्या पावसामुळे, आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी मात्र पुन्हा अडचणीत आला आहे. हातातोंडाला आलेले हरभरा, गहू, ज्वारीची पिके मातीत मिसळल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा माय बाप सरकारच्या आश्वासनावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. तर कांदे, मेथी, टमाटे, शेपू, मिरची, दोडका, कोबी पालेभाज्यांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वर्षी भरपूर प्रमाणात मोहर आलेल्या आंब्याचे सुद्धा अवकाळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने नुकसान केले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी होत आहे.
चाकूर तालुक्यात अवकाळी पाऊस
गेल्या दोन दिवसापासून चाकूर तालुक्यात आवकाळी पाऊस पडत असल्याने पिकांचे नुकसान होणार असून याचा फटका ज्वारीसह अनेक पिकांना होणार असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. उन्हाळ्याला सुरूवात झाली असली तरीही आवकाळी पावसाने कहर केला आहे .उन्हाचे तीव्र चटके बसत असतानाचा या पावसाने सुरूवात केली आहे. या पावसाचा फटका रबी पिकांला बसणार असून यात प्रामुख्याने ज्वारी ,हरभरा ,गहु व तुर या पिकांचे नुकसान होणार आहे .ज्वारीचे पिके आता काढणीस आले असून अनेक शेतकऱ्यांनी हरभरा काढून शेतातच ठेवला आहे. तर यावर्षी आंब्याला मोठ्या प्रमाणात तोर लागला असून या आवकाळी पावसामुळे व वादळामुळे नुकसान होणार आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना अर्थिक झळ सोसावी लागत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.



























































