Ratnagiri News – खेड येथील शिवसेनेच्या जनता दरबाराला उस्फुर्त प्रतिसाद; समस्या सुटल्याने नागरिकांनी व्यक्त केले समाधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत दापोली विधानसभा क्षेत्रातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांचा निपटारा व्हावा यासाठी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी खेड येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील माँसाहेब मीनाताई ठाकरे नाट्यगृहाजवळील खेड नगर वाचनालय येथे दुपारी १ ते सायंकाळी ४ या वेळेत माजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते. या आयोजित केलेल्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यामुळे शिवसेनेने जनतेसाठी आयोजित केलेला जनता दरबाराचा कार्यक्रम चांगलाच सफल झाला.

दापोली विधानसभा मतदार संघातील दापोली, मंडणगड आणि खेड येथील विविध प्रकारच्या समस्या घेऊन नागरिक जनता दरबाराला प्रत्यक्ष उपस्थित होते. जनता दरबारात समस्या घेऊन उपस्थित राहिलेल्या प्रत्येक समस्याग्रस्तांचे माजी जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर यांनी स्वतः जातीने दखल घेत त्यातील बहुतेक प्रश्न मार्गी लावले, तर काही प्रश्नांची तड लावण्यासाठी संबंधित अधिकारी वर्गाला सांगण्यात आले. तसेच आठवडा भरात प्रश्नांची सोडवणूक झाली नाही तर शिवसेना स्टाईलने त्याची दखल घेतली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. समस्या घेऊन आलेसे नागरिक स्वत:च्या वैयक्तिक प्रश्नांपेक्षा सार्वजनिक हिताच्या समस्या घेऊन अधिक आले होते. हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेला पहिलाच जनता दरबाराचा कार्यक्रम यशस्वी ठरल्याने आयोजक शिवसेनेचा आत्मविश्वास दुणावला. जनहितार्थ या पुढे देखील प्रत्येक महिन्याच्या २३ तारखेला शिवसेनेकडून जनता दरबार घेण्यात येणार आहे. तरी दापोली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी प्रत्येक महिन्याच्या २३ तारखेला जनता दरबाराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.