लातूरमध्ये 30 ते 32 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुका ‘शिक्षणाची पंढरी’ म्हणून ओळखला जातो. मात्र, याच ठिकाणी शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. थोरलेवाडी येथील क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या वसतिगृहात तब्बल 30 ते 32 विद्यार्थ्यांना वेळूच्या काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 21 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी उज्वल प्रकाश सोनी (रा. बैतुल, मध्य प्रदेश) याला आपल्या मोटारसायकलचे नुकसान वसतिगृहातील विद्यार्थ्यांनीच केल्याचा संशय होता. या किरकोळ कारणावरून त्याने संतापाच्या भरात संयम गमावत 30 ते 32 विद्यार्थ्यांना अश्लील शिवीगाळ करत वेळूच्या काठीने अमानुष मारहाण केली.

विशेष म्हणजे, मारहाणी दरम्यान “मी या शाळेचा प्राचार्य होणार आहे, तेव्हा तुम्हाला बघून घेतो,” अशी धमकीही त्याने विद्यार्थ्यांना दिल्याचे समोर आले आहे. समाज मार्गदर्शक म्हणून ज्याकडे पाहिले जाते, त्या शिक्षकी पदाची आकांक्षा बाळगणाऱ्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे कृत्य घडल्याने पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.

या प्रकरणी शाळेचे प्राचार्य जैबाबेरला प्रपीन नाडर (वय 42) यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी उज्वल सोनी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3) तसेच बालन्याय अधिनियम 2015 मधील कलम 75 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.

अहमदपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव पुढील तपास करत आहेत. जखमी विद्यार्थ्यांनी उपचार घेतल्यानंतर ही तक्रार नोंदविण्यात आली.

या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ‘शिक्षणाची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदपूरमध्ये घडलेल्या या प्रकाराचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त होत आहे.