हिंदुस्थान – अमेरिका व्यापार कराराच्या निषेधार्थ काँग्रेसचे मंगळवारी ‘किसान महाचौपाल’, राहुल गांधी सभेला करणार संबोधित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या नवीन व्यापार कराराच्या विरोधात काँग्रेसने आता थेट रस्त्यावरची लढाई सुरू करणार आहे. या कराराचा निषेध करण्यासाठी उद्या, मंगळवारी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये काँग्रेसतर्फे भव्य ‘किसान महाचौपाल’चे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे संबोधित करणार असून, या माध्यमातून केंद्र सरकारविरोधात जोरदार एल्गार पुकारला जाणार आहे.

हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करारामुळे देशातील शेती क्षेत्रावर आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर गदा येईल, असा दावा काँग्रेसने केला आहे. परदेशी शेती उत्पादने स्वस्त दरात हिंदुस्तानातील बाजारपेठेत आल्यास स्थानिक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडेल, ही भीती व्यक्त करत काँग्रेसने या आंदोलनाची हाक दिली आहे. राहुल गांधी यांनी संसदेतही या करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना ‘पंतप्रधानांनी अमेरिकेच्या दबावाखाली देशाचे हित गहाण ठेवले’ असा गंभीर आरोप केला होता. आता हाच मुद्दा घेऊन ते थेट जनतेच्या दरबारात जाणार आहेत.

भोपाळमधील या महाचौपालसाठी मध्य प्रदेश काँग्रेसने जय्यत तयारी केली असून, राज्यभरातून हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राजधानीत दाखल होत आहेत. माजी मुख्यमंत्री कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांच्यासह राज्यातील सर्व दिग्गज नेते या सभेसाठी मैदानात उतरले आहेत.