
गरजू महिलांना हेरून त्यांना आर्थिक आमिष दाखवत त्यांच्या गर्भाशयातील बिजांडांची विक्री करणाऱ्या टोळीचे धागेदोरे नागपूर, नाशिक, तेलंगणा ते बंगळुरूपर्यंत पोहोचले आहेत, अशी माहिती बदलापूर पोलिसांनी दिली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलांच्या फोनमधून बिजांड विक्रीचे रेटकार्डच समोर आले असून गर्भाशयातील बिजांडांची वाढ करणाऱ्या गरजू महिलांना ३० हजार रुपये तर त्याची विक्री करणाऱ्या दलाल महिलांना ७० ते ८० हजार रुपये दिले जात असल्याची धक्कादायक माहितीही पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणात कोणते मोठे डॉक्टर्स आणि कोण बडे मासे आहेत याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
बदलापूर येथील जोवेली भागात परिमंडळ ४ च्या पोलिसांनी छापा टाकत केलेल्या कारवाईत गरजू महिलांच्या गर्भाशयातील बिजांडांची विक्री करणारी टोळीच उघडकीस आली. या घटनेने बदलापूरसह अवघ्या महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. या टोळीने तीनशेहून अधिक गरजू महिलांना आर्थिक आमिष दाखवून त्यांना बिजांड वाढीचे इंजेक्शन देत गर्भाशयातील बिजांडे वाढवली होती. नंतर या महिलांना रुग्णालयात नेऊन त्यांची बिजांडे काढून त्याची विक्री केली होती.
आरोपींना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
या प्रकरणात आरोपी सुलक्षणा गाडेकर हिच्यासह अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखेडे यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांनी दिलेली माहिती ऐकताच पोलीसही चक्रावून गेले. या तीनही महिला आरोपींना कल्याण न्यायालयाने २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या महिलांच्या मोबाईलमधून मिळालेल्या माहितीनुसार या महिला ७० ते ८० हजार रुपयांना बिजांडांची विक्री आयव्हीएफ सेंटर्सना करत होत्या आणि गर्भाशयात बिजांडांची वाढ करणाऱ्या गरजू महिलांना ३० हजार रुपयांची रक्कम मिळत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
कॉलरेकॉर्ड करणार पर्दाफाश
बिजांडांची विक्री करणाऱ्या बदलापुरातील टोळीचे धागेदोरे नाशिक, नागपूरसह तेलंगणा आणि बंगळुरूपर्यंत पोहोचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी महिलांच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड कसून तपासण्यास सुरुवात केली असून त्यातून मिळालेल्या संपर्क क्रमांकातून आणखी काही दलाल आणि बड्या माशांच्या नावाचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.






























































