
प्रेमविवाह केल्याच्या संतापातून नवरदेवावर गोळीबार केल्याची घटना महागाव परिसरात घडली. आज पहाटे झालेल्या या घटनेमुळे बोईसर हादरले आहे. या हल्ल्यात नवरदेव प्रीतेश वरखंडे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बोईसर पोलिसांनी हल्लेखोर उमेश घरतविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बेटेगाव येथे राहणारे हल्लेखोर उमेश घरत यांचे घराशेजारीच चिकन भुजिंग सेंटर आहे. प्रीतेश वरखंडे हा त्यांच्या दुकानात कामाला असून तो महागाव परिसरात राहतो. त्याचे उमेश यांच्या घरी काम करणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले. मात्र दोन वर्षांपासून सुरू असलेले त्यांचे प्रेमप्रकरण दोघांनीही उमेश यांच्यापासून लपवून ठेवले होते. दरम्यान त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचे ठरवले आणि पोबारा केला. त्यांनी वैदिक पद्धतीने मंदिरात जाऊन विवाह केला. याबाबत माहिती मिळताच उमेश यांच्या संतापाचा भडका उडाला. लग्न करून नवे जोडपे घरी परतल्याची माहिती मिळताच उमेश आज पहाटे प्रीतेशच्या घरात घुसला आणि गोळीबार केला.
हल्लेखोर फरार
गोळीबारात प्रीतेशच्या डोक्याच्या मागच्या भागाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर उमेश घरत हा फरार झाला आहे. याप्रकरणी बोईसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.































































