पत्रिका न जुळल्याचे कारण सांगून लग्नास नकार देणे ठरू शकतो गुन्हा; दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
court

लग्नाचे खोटे आश्वासन देऊन एखाद्या महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि नंतर पत्रिका जुळत नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करून लग्नास नकार देणे हा फौजदारी गुन्हा ठरू शकतो, असा महत्त्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. एका बलात्कार प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने ही टिप्पणी केली. अशा प्रकरणांमध्ये पुरुषाने सुरुवातीला दिलेल्या वचनांच्या सत्यतेवर आणि त्याच्या हेतूवर शंका निर्माण होते, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा यांच्या खंडपीठासमोर झाली. सुनावणी दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीला सुरुवातीला त्यांच्या पत्रिका जुळत असून लग्नात कोणताही अडथळा येणार नाही, असा ठाम विश्वास दिला होता. इतकेच नव्हे तर, एका संदेशात त्याने पीडितेशी तातडीने लग्न करण्याची तयारीही दर्शविली होती. मात्र, शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर आरोपीने अचानक भूमीका बदलली आणि पत्रिका जमत नसल्याचे कारण सांगून लग्नास नकार दिला. न्यायालयाने यावर ताशेरे ओढताना म्हटले की, जर कुंडली जुळवणे हा लग्नासाठी इतका महत्त्वाचा निकष होता, तर शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वीच हा प्रश्न सोडवायला हवा होता.

तक्रारदार महिलेने असा आरोप केला आहे की, आरोपीचे तिच्याशी दीर्घकाळापासून संबंध होते आणि त्याने लग्नाचे आमिष दाखवून अनेक वेळा तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. विशेष म्हणजे, यापूर्वी आरोपी आणि त्याच्या कुटुंबाने लग्नाचे आश्वासन दिल्यानंतर पीडितेने आपली तक्रार मागे घेतली होती. मात्र, आश्वासन देऊनही नंतर पत्रिकेचे कारण पुढे करून फसवणूक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीचे हे वर्तन त्याच्या मागील दाव्यांशी विसंगत असल्याचे मानले आहे.

न्यायालयाने नमूद केले की, सुरुवातीला पत्रिका जुळत असल्याचे सांगून संमती मिळवणे आणि नंतर त्याच मुद्द्यावरून नकार देणे हे प्रथमदर्शनी फसवणुकीचे लक्षण दिसते. हे वर्तन फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 69 अंतर्गत गुन्हा ठरू शकते, जे विशेषतः लग्नाचे खोटे आश्वासन देऊन किंवा फसवणूक करून मिळवलेल्या लैंगिक संमतीशी संबंधित आहे. खोट्या आश्वासनांच्या आधारावर मिळवलेली संमती ही कायद्याने वैध संमती मानली जाऊ शकत नाही, असे अधोरेखित करत न्यायालयाने आरोपीला जामीन देण्यास नकार दिला.