वडिलांच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून ड्रममध्ये भरले! 21 वर्षीय मुलाचे धक्कादायक कृत्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका 21 वर्षीय मुलाने आपल्या 50 वर्षीय वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरुवातीला या हत्येमागे ‘नीट’ परीक्षेच्या तयारीसाठी असलेला दबाव हे मुख्य कारण असल्याचे वाटत होते. मात्र, पोलीस तपासात या गुन्ह्यामागे कौटुंबिक कलह आणि वडिलांच्या व्यावसायिक साम्राज्यावर ताबा मिळवण्याची मुलाची महत्त्वाकांक्षा असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.

मूळचे जालौन जिल्ह्यातील रहिवासी असलेले मानवेंद्र सिंग यांनी लखनौमध्ये कष्टाने आपला जम बसवला होता. त्यांच्या मालकीच्या चार पॅथॉलॉजी लॅब्स आणि तीन परवानाधारक दारूची दुकाने होती. पत्नीच्या निधनानंतर मानवेंद्र यांनी आपला मुलगा अक्षत आणि मुलगी कृती यांचा सांभाळ केला. मानवेंद्र यांची इच्छा होती की, अक्षतने डॉक्टर होऊन समाजात नाव कमवावे. यासाठी त्यांनी अक्षतला एका प्रतिष्ठित शाळेत शिकवले आणि त्यानंतर नीट परीक्षेच्या तयारीसाठी एका मोठ्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशही मिळवून दिला होता. मात्र, अक्षत दोनदा या परीक्षेत अपयशी ठरला. यावरून पिता-पुत्रात तणाव वाढू लागला होता. पोलिसांच्या चौकशीत असे समोर आले आहे की, अक्षतला डॉक्टर होण्यात फारसा रस नव्हता. त्याला वडिलांचा प्रस्थापित झालेला व्यवसाय सांभाळायचा होता. “डॉक्टर व्हायला अनेक वर्षे लागतील, त्यापेक्षा मी आताच व्यवसाय का सांभाळू शकत नाही?” असा त्याचा विचार होता. या वैचारिक मतभेदांमुळे त्यांच्यातील दरी वाढत गेली. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी घरातून काही दागिने चोरीला गेले होते. सुरुवातीला नोकरावर संशय घेण्यात आला. पण नंतर या चोरीत अक्षतचा हात असल्याचे संशयितरीत्या समोर आले. मुलाची बदनामी टाळण्यासाठी मानवेंद्र यांनी तक्रार मागे घेतली. पण त्यांचा अक्षतवरील विश्वास पूर्णपणे उडाला होता. तेव्हापासून ते त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते.

20 फेब्रुवारी रोजी सकाळी पुन्हा एकदा नीटच्या अभ्यासावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात अक्षतने त्याच्या वडिलांच्याच परवानाधारक रायफलने त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी लागताच मानवेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीचा आवाज ऐकून अक्षतची बहीण कृती तिथे पोहोचली. मात्र अक्षतने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प केले. या दहशतीमुळे ती चार दिवस कोणालाही काहीही सांगू शकली नाही. हत्येनंतर अक्षतने पुरावे नष्ट करण्यासाठी अत्यंत क्रूर पावले उचलली. त्याने वडिलांचा मृतदेह तिसऱ्या मजल्यावरून खाली ओढत आणला. मृतदेह जड असल्याने त्याने बाजारपेठेतून करवत आणून मृतदेहाचे तुकडे केले. हात आणि पाय कापून त्याने ते गाडीच्या डिकीत भरले आणि सदरौना परिसरात फेकून दिले. धडाची विल्हेवाट लावणे कठीण झाल्याने त्याने तो एका निळ्या रंगाच्या ड्रममध्ये भरून ठेवला. मृतदेहाचे डोके अद्याप पोलिसांना सापडलेले नाही. हत्येनंतर त्याने घरातील रक्ताचे डाग पुसण्यासाठी ॲसिडचा वापर केला होता.

मानवेंद्र बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर अक्षतने सुरुवातीला ते दिल्लीला गेल्याचा बनाव रचला. मात्र, पोलिसांना त्याच्या बोलण्यात विसंगती आढळली. घराची झडती घेतली असता फॉरेन्सिक टीमला कारमध्ये रक्ताचे डाग आणि स्वच्छतेचे प्रयत्न केल्याच्या खुणा सापडल्या. सखोल चौकशीत अक्षतने आपला गुन्हा कबूल केला. निवृत्त पोलीस अधिकारी असलेल्या आजोबांचा आणि पोलीस दलात असलेल्या काकांचा वारसा असूनही अक्षतने केलेल्या या कृत्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.