
आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजमहेंद्रवरम शहरात भेसळयुक्त दुधामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. हे विषारी दूध प्यायल्याने गेल्या ४८ तासांत ४ वृद्धांचा मृत्यू झाला असून, १० पेक्षा जास्त लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दूध प्यायल्यानंतर नागरिकांना उलट्या, पोटदुखी आणि लाघवीवेळी त्रास होणे, अशा समस्या जाणवू लागल्या. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तपासणीत असे दिसून आले की, पीडितांच्या रक्तातील युरिया आणि क्रिएटिनिनचे प्रमाण कमालीचे वाढले होते, ज्यामुळे त्यांची किडनी निकामी झाली. मृत व्यक्तींची नावे एन. शेषगिरी राव (७२), राधाकृष्ण मूर्ती (७४), ताडी कृष्णवेणी (७६) आणि ताडी रमणी (५८) अशी आहेत.
तपासात असे समोर आले आहे की, ही दुर्घटना वरलक्ष्मी डेअरी नावाच्या विनापरवाना दुग्धालयातून पुरवण्यात आलेल्या दुधामुळे घडली आहे. या डेअरीचा चालक अदला ज्ञानेश्वर राव याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून डेअरी सील करण्यात आली आहे. या डेअरीतून परिसरातील १०६ कुटुंबांना दूध पुरवले जात होते.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.



























































