
दक्षिणेकडील राज्य असलेल्या केरळचे नाव बदलून अधिकृतपणे ‘केरळम’ करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर मंजुरी दिली आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या काही महिने आधी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील ‘सेवा तीर्थ’ या नवीन पंतप्रधान कार्यालय (PMO) इमारतीत आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. साऊथ ब्लॉकमध्ये १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीनंतर, नवीन वास्तूत पार पडलेली ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक होती.
दोन वेळा ठराव संमत
केरळ विधानसभेने २५ जून २०२४ रोजी दुसऱ्यांदा एकमताने हा ठराव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला होता. यापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्येही असाच ठराव मांडण्यात आला होता, मात्र केंद्र सरकारने तांत्रिक बदलांच्या सूचना देऊन तो पुन्हा पाठवला होता. सुधारित प्रस्तावानंतर आता केंद्राने याला हिरवा कंदील दाखवला आहे.
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व
मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी विधानसभेत हा ठराव मांडला होता. संविधानाच्या आठव्या अनुसूचीतील सर्व भाषांमध्ये राज्याचे नाव ‘केरळम’ करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. मल्याळम भाषेत राज्याला ‘केरळम’ असेच संबोधले जाते. स्वातंत्र्यलढ्यापासूनच मल्याळम भाषिक राज्यासाठी सुरू असलेल्या चळवळीत ‘केरळम’ या नावाचा सांस्कृतिक संदर्भ अधिक गडद आहे, असे मुख्यमंत्री विजयन यांनी स्पष्ट केले होते.
कलम ३ अंतर्गत घटनादुरुस्ती
संविधानाच्या ‘कलम ३’ अन्वये राज्याच्या नावात बदल करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी विनंती राज्य सरकारने केली होती. या मंजुरीमुळे आता संविधानातील पहिल्या अनुसूचीमध्ये बदल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Kerala to be Officially Known as ‘Keralam’: Union Cabinet Approves Proposal
The Union Cabinet has approved the proposal to rename Kerala as ‘Keralam’. The decision aligns with the state’s cultural identity and language.



























































