
दसरा, दिवाळीसह ऐन सणासुदीत विमान कंपन्यांनी जो भाडेवाढीचा पायंडा पाडला आहे, त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. सणांमध्ये आणि आपत्कालीन परिस्थितीत खासगी विमान कंपन्या प्रवाशांकडून अवाचे सवा भाडे वसुली करत आहेत. हा एक अत्यंत गंभीर चिंतेचा विषय आहे, असे सांगत सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 23 मार्च रोजी होणार आहे.
हे प्रकरण एका जनहित याचिकेशी संबंधित असून यात खासगी विमान कंपन्यांकडून सणांच्या काळात अचानक भाडे वाढवणे आणि अतिरिक्त शुल्क आकारण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम बनवण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायाधीश विक्रम नाथ आणि न्यायाधीश संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सर्वोच्च नायायालयाने केंद्र सरकार व नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांना उत्तर देण्यासाठी चार आठवडय़ांचा वेळ दिला आहे. हे प्रकरण सामान्य जनतेच्या हिताशी संबंधित आहे. सणांच्या काळात हवाई भाडय़ात अचानक होणारी मोठी वाढ शोषणासारखी आहे, असे कोर्टाने म्हटले होते.




























































