वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या लॉटरीची चौकशी करा! अलॉटमेंटच्या नावाखाली भेदभावाचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबात आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. अलॉटमेंटच्या नावाखाली वरळी बीडीडीतील सामाजिक ऐक्य मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू असून रहिवाशांमध्ये शासनाविरोधात प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे समाजात ऐक्य राहील असा निर्णय घ्या, अशी मागणी सचिन अहिर यांनी केली.

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामध्ये म्हाडाकडून घरांच्या लॉटरी वाटप प्रक्रियेत होणाऱ्या बदलांमुळे रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. या बदलांमुळे मागासवर्गीय, तेलुगू आणि मुस्लिम समाजातील नागरिकांवर अन्याय होत आहे. याविरोधात कालच बीडीडी चाळ क्र. 88 आणि 89 रहिवाशांनी म्हाडावर मोर्चा काढला होता. बीडीडी चाळ पुनर्विकास हा इतका चांगला प्रोजेक्ट असूनही केवळ लॉटरी प्रक्रिया व्यवस्थित पार पडत नसल्यामुळे रहिवाशी रस्त्यावर उतरून मोर्चे काढतायत, याकडे सचिन अहिर यांनी सरकारचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले की, वाटप प्रक्रियेतील कोणत्याही त्रुटी खपवून घेतल्या जाणार नाहीत. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी लवकरच म्हाडा उपाध्यक्ष आणि लोकप्रतिनिधींची विशेष बैठक बोलावली जाईल.