
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि राज्य शासनाने बजेटमध्ये तरतूद करून सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेनेने विधान परिषदेत केली.
राज्यातील शाळेतील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही बसविण्याबाबत सुधाकर अडबाले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील 17 हजार शाळात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. उर्वरित चार हजार शाळात लवकरच सीसीटीव्ही बसविले जातील, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. त्यावर माध्यमिक शाळांमध्ये ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र आहे तिथल्या प्रत्येक वर्गात पॅमेरे बसवले नाही तर त्या शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल, अशी बोर्डाने धमकी दिल्यामुळे बऱ्याचशा माध्यमिक शाळांनी भाडय़ाने कॅमेरे बसवले आहेत, याकडे ज. मो. अभ्यंकर यांनी लक्ष वेधले. मुंबई शहरात 255 माध्यमिक शाळांपैकी 240 शाळांच्या प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही नाहीत. या शाळा स्वतःहून सीसीटीव्ही बसवू शकत नाहीत, आपण त्यांना फी घेऊ देत नाही आणि त्यांना अनुदानही देत नाही. त्यामुळे डीपीडीसीच्या माध्यमातून आणि राज्य शासनाने बजेटमध्ये तरतूद करून शंभर टक्के शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी त्यांनी केली.
…तर शासन पुढाकार घेईल
त्यावर उत्तर देताना मंत्री पंकज भोयर म्हणाले, शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुमारे 18 हजार शाळांत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मुंबईतील ज्या 240 शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीत त्या शाळा पालिकेच्या आहेत की खासगी संस्थांच्या आहेत हे आधी बघावे लागेल. या शाळांची यादी मिळाली आणि त्या संस्थांची तशी परिस्थिती नसेल तर शासन सीसीटीव्ही बसवण्यासाठी पुढाकार घेईल.





























































