
विरोधकांचाही समावेश असलेल्या ‘नियम समिती’ला अंधारात ठेवून स्थगन प्रस्ताव सादर करण्याबाबत नवा नियम लागू करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारला विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याने सभापती शिंदे यांनी परिषदेचे कामकाज 15 मिनिटे तहपूब केले.
काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी 289 नियमाद्वारे आरोग्याच्या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. सभापती शिंदे यांनी प्रस्ताव ऑनलाईन सादर करायचे असताना ऑफलाईन सादर केल्याचे सांगत तो कामकाजात समाविष्ट न केल्याचे कारण दिले. त्यावर शिवसेना आमदार अनिल परब यांनी त्यावर हरकत घेत नियम समितीत एक तासापूर्वी प्रस्ताव देण्याचा नियम आहे. तरीही प्रस्ताव का स्वीकारला नाही? समितीचे अधिकार परस्पर घेतले जातात का, अशा प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच सभापतींना विशेषाधिकाराची आठवण करून देत यावर खुलासा करावा, अशी मागणी केली. यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी काही आक्षेप असेल तर नियम समितीकडे जा असे सांगितले. यावर परब यांनी नियम समितीची अद्याप बैठकच झाली नसल्याचे सांगत दरेकरांचा मुद्दा खोडून काढला. सत्ताधारी विरोधकांमध्ये यावेळी शाब्दिक खडाजंगी झाली.



























































