
मराठी भाषा गौरव दिन परवा शुक्रवारी आहे. सरकारी पातळीवर मराठीचा हा उत्सव साजरा करण्याची लगबग सुरू आहे. कार्यक्रमांची जंगी आखणी करण्यात सगळेच मग्न आहेत. मात्र, प्रत्यक्षात मराठी भाषेच्या समृद्धी आणि संवर्धनाचा पाया असलेल्या मराठी शाळाच महाराष्ट्रात मरणकळा सोसत आहेत, अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या पाच विभागांत मिळून तब्बल 255 मराठी शाळा बंद पडल्या आहेत, अशी कबुली खुद्द सरकारनेच आज लेखी उत्तरात विधान परिषदेत दिली.
मराठी शाळा कमी पटसंख्येमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. शासनाने 2025मध्ये 620 मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून 70 गावांत ना शाळा, ना पेन्सिल अशी परिस्थिती आहे. मराठी शाळांमधील विद्यार्थीसंख्या वाढवण्यासाठी शासनाने काय उपाययोजना केल्या याबाबत अमोल मिटकरी, विक्रम काळे, शिवाजीराव गर्जे, इद्रिस नायकवाडी, सतीश चव्हाण, सत्यजित तांबे यांनी तारांकित प्रश्न विचारला होता, त्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी लेखी उत्तर दिले.
उपाययोजना सुरू आहेत…
कमी पटाच्या मराठी शाळा टिकवण्यासाठी विद्यार्थी संख्या वाढवणे, शाळा प्रवेशोत्सव, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके, गणवेश, शिक्षक प्रशिक्षक उपक्रम आदी उपाययोजनांची शासनाकडून अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली.
पालकांचा कल इंग्रजी भाषेच्या शाळांकडे
पालकांचा कल इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेण्यासाठी वाढत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांच्या तुलनेत कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागातील 255 मराठी शाळा बंद झाल्या आहेत, अशी कबुली दादा भुसे यांनी दिली. मराठी शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय शासनस्तरावर घेतला नसल्याचे भुसे यांनी आपल्या उत्तरात नमूद केले.






























































