
विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते नेमले गेलेले नाहीत. यावरून शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी आज महायुती सरकारवर हल्ला चढवला. राज्याच्या इतिहासात विरोधी पक्षनेता नसलेले पहिले अधिवेशन, अशी टीका त्यांनी केली.
विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी विधान भवन आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुती सरकारचा विविध मुद्दय़ांवरून समाचार घेतला. विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करण्यात सरकार टाळाटाळ करत आहे. विरोधी पक्षनेता नेमण्यात सरकारला कसली भीती वाटतेय, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
मराठा आरक्षण आणि कर्जमाफीच्या निवडणूकपूर्व घोषणा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटना चिंताजनक आहेत. त्यावर ठोस कारवाई केली पाहिजे. पुण्यात काँग्रेस प्रवत्ते हनुमंत पवार यांना झालेल्या मारहाणीचा उल्लेख करत त्यांनी गृहखात्याच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले.
छापील उत्तरे नको, मंत्र्यांनी खिडकी उघडून बाहेर पाहावे
मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. मुंबईतील हवेत प्रदूषण आहे. ते कमी करण्यासाठी उपाय केले पाहिजेत असे आपण महानगरपालिका आयुक्तांना सांगितले होते. मात्र त्यावर काहीच कारवाई केली गेली नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. परिवहन मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रदूषणावर विधानसभेत केवळ छापील उत्तरे न देता खिडकी उघडून बाहेरची परिस्थिती पाहावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याचा पैसा गायब
लाडक्या बहिणींमुळे राज्याच्या तिजोरीवर भार वाढला नसून, महायुती सरकारच्या भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याचे पैसे गायब होत आहेत असे म्हणत, लाडक्या बहिणींमुळे आर्थिक भार पडत असल्याचा सरकारचा दावा आदित्य ठाकरे यांनी फेटाळून लावला.

































































