धक्कादायक! रोज 160 महिला-मुली बेपत्ता होताहेत! देवाभाऊंच्या राज्यात लाडक्या बहिणी असुरक्षित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवाभाऊंच्या राज्यात लाडक्या बहिणी असुरक्षित असल्याचे अधोरेखित करणारी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात गेल्या दोन वर्षांत 1 लाख 17 हजार मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. या आकडेवारीनुसार दिवसाला 160 मुली आणि महिला बेपत्ता होत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात ही आकडेवारी दिली. 2024 आणि 2025 या दोन वर्षांत 1 लाख 17 हजार 369 मुली आणि महिला बेपत्ता झाल्या. त्यातील 86 हजार 228 महिलांचानंतर शोध लागला.

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात साडेचार हजारांवर महिला, मुली बेपत्ता

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपूर जिह्यातही महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये गेल्या दोन वर्षांत वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांत नागपुरातून 3779 महिला आणि 761 मुली बेपत्ता झाल्या. रायगड आणि छत्रपती संभाजीनगर जिह्यातही महिला व मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे चिंता व्यक्त होत आहे.

मुंबईसह पाच जिह्यांतून 15 ते 18 वयोगटातील पाच हजार मुले बेपत्ता

मुंबई शहर जिह्यासह नवी मुंबई, रायगड, नागपूर शहर आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिह्यांतून 2024 आणि 2025 या दोन वर्षांमध्ये पाच हजार मुले बेपत्ता झाली. त्यातील 4813 मुलांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आल्याचे आकडेवारी सांगते. 

मुंबईतील साडेचार हजार अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश

मुंबईमध्ये 2024-25 या वर्षात 1435 मुले आणि 3080 मुली बेपत्ता झाल्या. तपासानंतर त्यातील 4455 मुले आणि मुलींना शोधण्यात यश आले. मुंबईजवळच्या नवी मुंबईतूनही 974 मुले-मुली बेपत्ता झाली.

2024

हरवलेल्या महिला           45,662

अल्पवयीन मुली 11,316

2025

हरवलेल्या महिला           48,278

अल्पवयीन मुली 10,295