परदेश दौऱ्यांवर अ‍ॅण्ड्र्यूंच्या ‘विशेष मसाज’साठी जनतेच्या पैशांचा चुराडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटनचे माजी युवराज अ‍ॅण्ड्र्यू हे एका नव्या वादात अडकले आहेत. ब्रिटनचे व्यापार राजदूत असताना एका परदेश दौऱ्यामध्ये त्यांनी ‘मसाज’ सेवेसाठी करदात्यांच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची आता चौकशी सुरू करण्यात आली आहे.

अ‍ॅण्ड्र्यू हे वर्ष 2001 पासून ब्रिटनचे व्यापार राजदूत होते. त्या काळात सरकारी सेवेत असलेल्या एका अधिकाऱ्याने यासंदर्भात उलगडा केला आहे. त्यांनी सांगितले की, अ‍ॅण्ड्र्यू हे मध्य पूर्वेतील देशांच्या दौऱ्यावर असताना मसाज सेवांवर झालेला खर्च मिळण्यासाठी दावा करण्यात आला होता. यावर काही अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. मी या खर्चाला विरोध करताना म्हटले होते की, आपण या खर्चाचे पैसे देऊ नये, मात्र वरिष्ठ सहकाऱ्यांनी माझ्या विरोधाला जुमानले नाही. आम्हाला तो खर्च द्यावा लागला. विशिष्ट मसाज सेवेसंबंधित दाव्यांची पडताळणी संबंधित विभागातील सूत्रांनी केल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.