
कोल्हापूर विमानतळावर नव्या टर्मिनस बिल्डिंगसह विविध विकासकामे सुरू आहेत. अशातच कोल्हापूरच्या आणखी एका मागणीस यश आले आहे. नुकतेच मुंबईचे नवीन विमानतळ सुरू झाल्याने जुन्या विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर ते नवी मुंबई या मार्गावर आठवडय़ातील सातही दिवस, सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रांमध्ये 29 मार्चपासून विमानसेवा सुरू होणार आहे. ‘इंडिगो’कडून ही सेवा सुरू होत असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
रोज सकाळी आठ वाजता नवी मुंबई विमानतळावरून कोल्हापूरसाठी इंडिगोचे विमान उड्डाण घेईल. सव्वानऊ वाजता हे विमान कोल्हापुरात येईल, त्यानंतर सकाळी 9 वाजून 35 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण घेतलेले विमान नवी मुंबई विमानतळावर 10 वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल. तर सायंकाळी 7.20 वाजता नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण घेतलेले विमान रात्री 8.30 वाजता कोल्हापुरात येईल. त्यानंतर 8 वाजून 50 मिनिटांनी कोल्हापुरातून सुटणारे विमान 9.50 वाजता नवी मुंबई विमानतळावर उतरेल.
विशेष म्हणजे आठवडय़ातील सातही दिवस, इंडिगोची विमानसेवा सुरू होत असल्याने, कोल्हापुरातून मुंबईला जाऊन दिवसभरातील कामे पूर्ण करून पुन्हा सायंकाळी कोल्हापूरला परत येणे सहज शक्य होणार आहे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. सुरुवातीला या मार्गावरील तिकीट दर 7 हजार 600 रुपये असणार आहे.



























































