
शनिशिंगणापुरात शनिभक्तांची लूट होण्याचे प्रकार थांबण्याचे दिसत नाही. पूजा साहित्याचे दर फिक्स करून त्याचे फलकही लावण्यात आले असले तरी शनिवारी एका शनिभक्ताला पूजेचे ताट 1800 रुपयांना विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
शनिशिंगणापूर देवस्थानच्या प्रशासकांनी पूजा साहित्याचे दर निश्चित करून किमान पाचशे रुपयांना पूजा विकण्याचे आदेश काढले. या दराचे फलक मंदिर परिसर तसेच सर्व वाहनतळावर लावण्याचे आदेश दिले. तरीही भाविकांची लूट काही थांबत नसल्याचे दिसत आहे. शनिवारी 1800 रुपयांत पूजेचे ताट देऊन एका भाविकाची लूट करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी भाविकांने ई-साक्षी प्रणालीतून तक्रार दिल्याने एजंटावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर येथील रोशन मोरया यांना मंदिराजवळील ग्रामपंचायत वाहनतळ येथे जाधव नावाच्या एजंटाने भाविकांची वाहन थांबवून पूजा साहित्याचे ताट 1800 रुपये सांगितले. 1800 रुपये जास्त असल्याचे सांगितल्याने दुकानदार व एजंटाने भाविकासमवेत वाद केला. शिवीगाळ व दमदाटी केल्याने मोरया यांनी 1800 रुपयांना पूजा ताट घेतले. त्यानंतर 112 नंबर पोलीस ठाण्याला कॉल करून माहिती दिली. शनिशिंगणापूर पोलिसांनी लगेच या तक्रारीची दखल घेऊन भाविकाची ई-साक्षी प्रणालीद्वारे व्हिडीओ चित्रीकरण करून तक्रार घेतली. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.






























































