
निसर्गरम्य माथेरानमधील सर्व 94 – हातरिक्षाचालकांना ई-रिक्षा द्याव्यात या मागणीसाठी सोमवारपासून पुकारलेला संप आज दुसऱ्या दिवशीही सुरूच होता. येथील रस्त्यांवर एकही रिक्षा धावली नाही. त्यामुळे माथेरानकरांना सध्या फक्त हातरिक्षांचाच आधार असून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचे हाल होत आहेत.
माथेरानमधील हातरिक्षा ओढण्याची अमानवी परंपरा कायमची बंद करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सनियंत्रण समितीला दिले होते. पण त्याची अंमलबजावणी पूर्णपणे झालेली नाही. त्यामुळे ई-रिक्षाचालकांनी संप पुकारला आहे. ऐन परीक्षेच्या काळात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना केंद्र गाठण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
श्रमिक ई-रिक्षा संघटनेच्या शिष्टमंडळाने स्थानिक लोकप्रतिनिधींची भेट घेऊन त्यांना आपली समस्या सांगितली. यावेळी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी व मुख्याधिकारी राहुल इंगळे हेदेखील उपस्थित होते. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी टप्याटप्प्याने ई-रिक्षांची संख्या वाढवू, असे आश्वासन दिले आहे.



























































